चार तास काम योजना

चार तास काम योजना

समितीतील प्रत्येक विद्यार्थ्याला संस्थेसाठी रोज अर्धा तास (आठवड्यातून चार तास) कामासाठी द्यावे लागतात. स्वच्छता, कार्यालयात, भोजनालयात काम असे त्याचे स्वरूप असते. त्यातून श्रमसंस्काराची जाणीव दृढ होते. या कामाच्या नोंदी ठेवल्या जातात. त्याला श्रेणी दिली जाते.

कमवा व शिका योजना

समितीमध्ये स्वावलंबन व अर्थार्जनासाठी कमवा व शिका ही योजना अनिवार्य आहे. या योजनेत काम केल्याने
श्रमसंस्कार लक्षात येऊन पैशाचे मोल कळते, संभाषण कौशल्य, कामाची जबाबदारी, स्वावलंबन, व्यवहाराचे अनौपचारिक शिक्षण मिळते. रोज किमान एक ते दोन तास काम केल्यामुळे त्यांचा महिन्याचा खर्च भागण्यास व पालकांवरील आर्थिक ताण कमी होण्यास मदत होते.

कमवा आणि शिका

कामाचे स्वरुप

१) आपण स्वत: विद्यार्थ्याचे पालक आहोत असे समजून त्याला काम सांगावे. विद्यार्थ्याची नोकरी न समजता त्यांच्या शिक्षणात त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यात आपला वाटा आहे, हे जाणून त्याच्याकडून काही चूक व गैरवर्तन घडल्यास त्यांना त्याबाबत योग्य सूचना व मार्गदर्शन करावे.

२) आपल्याकडे काम करताना मिळालेल्या अनुभवांचा व संस्कारांचा विद्यार्थ्याला त्याच्या पुढील आयुष्यात लाभ व्हावा,mतो कर्तृत्ववान होण्यास आपला सहभाग असावा अशी समितीची इच्छा आहे.

३) विद्यार्थी या योजनेत पुढील प्रकारची कामे करु शकतात.
१) कार्यालयीन मदत २) लेखनिक ३) डाटा एंट्री (संगणक) ४) संगणकावरील कामे ५) बँकांची कामे ६) शिकवणी ७) रिसेप्शनिस्ट ८) वर्तमानपत्र, पुस्तके वाचन करुन दाखवणे ९) वृध्दसेवा १०) फिरावयास जाण्यास सोबत ११) घरातील कामात मदत १२)  बागकाम १३) पर्यावरण संस्थांच्या वृक्षारोपण मोहिमेतील कामे अशी नियमित स्वरुपाची कामे तर हंगामी स्वरुपाच्या कामांमध्ये पत्रके वाटप, इव्हेंट मॅनेजमेंट, उत्तरपत्रिका तपासणी अशी कामे समाविष्ट आहेत. कमवा शिकाच्या कामाचे तास दररोज एक किंवा दोन तास अथवा विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार आठवड्यात ४ ते ६ तास असतात.
४) कृपया कामाबद्दलची माहिती नीट समजावून सांगून, सुरवातीला त्यांच्याकडून काम करवून घ्यावे.
५) आठवड्यातून एक दिवस सुट्टी द्यावी. शक्यतो रविवारी किंवा दोघांच्या सोयीनुसार
६) मोबदल्याखेरीज इतर कोणत्याही प्रकारे पैसे (उसने/ उचल वगैरे) विद्यार्थ्यास देऊ नयेत.
७) विद्यार्थ्यास ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ किंवा अन्य वेळी कामास बोलावू नये. कारण त्यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होण्याची शक्यता असते.
८) चांगल्या कामाबद्दल विद्यार्थ्यास प्रोत्साहन म्हणून मदत केली किंवा मोबदल्याची रक्क्म वाढवून दिली तर त्याची लेखी सूचना कृपया, समितीच्या कार्यालयात द्यावी.
९) दिवाळी किंवा उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये व विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या कालावधीमध्ये कामात खंड पडण्याची शक्यता असते.
१०) विद्यार्थ्यांच्या कामाबद्दल आपणास चर्चा करावयाची असल्यास सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ ते सायं. ४ या वेळेत शक्य झाल्यास कार्यालयात प्रत्यक्ष भेटावे किंवा दूरध्वनीवरुन संपर्क साधावा.

पाल्य पालक योजना
समितीला पालकत्व योजनेत देणगी देणाऱ्या साहाय्यदात्याला विद्यार्थी महिन्यातून एकदा त्यांच्या घरी जाऊन भेटतात. त्यांची विद्यार्थ्याच्या शिक्षणाविषयी, कौटुंबिक स्थितीविषयी चर्चा होते, काहीवेळा विद्यार्थ्याला मार्गदर्शन मिळते. त्यातून विद्यार्थ्याची प्रगती साधण्यास मदत होते. शक्यतो साहाय्यदात्यांच्या शैक्षणिक, व्यावसायिक अनुभवानुसार त्या त्या शाखेचे विद्यार्थी भेटीसाठी पाठवले जातात. एक ग्रामीण घर एका शहरी घराशी जोडले जाते.