विद्यार्थी साहाय्यक समिती, ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तनात घडविणारी संस्था आणि युवा परिवर्तनाचे केंद्र म्हणून विद्यार्थी साहाय्यक समितीच्या कामाकडे पाहिले जाते. समिती ही धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० च्या कलम ५० ए (३) अंतर्गत नोंदणीकृत (क्र. ई-२१९, पुणे) संस्था असून संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारतभर आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु गुणवत्तेच्या जोरावर काहीतरी ध्येय ठेवून धडपड करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना पुण्यात अतिशय माफक दरात राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध करून द्यावी या हेतूने ज्येष्ठ गणितज्ज्ञ डॉ. अच्युतराव आपटे, स्वातंत्र्यसेनानी हरिभाऊ फाटक, सुमित्राताई केरकर आदींनी १९५५ मध्ये या कामाला सुरवात केली. समिती म्हणजे केवळ लॉजिंग बोर्डिंग नाही तर येथे माफक दरात निवास, भोजन व्यवस्थेबरोबर व्यक्तिमत्त्व विकास या संकल्पनेला सर्वाधिक महत्त्व असते. स्वच्छता, समता आणि श्रमप्रतिष्ठा या त्रिसूत्रीवर समितीचे काम चालते.

खोली एका खोलीत तीन किंवा चार विद्यार्थ्यांची खोलीच्या आकारानुसार व्यवस्था केली जाते. खोलीत प्रत्येकाला कॉट, गादी, टेबल, खुर्ची, कपाट, पंखा आदी सुविधा असतात.
भोजनालय
भोजनालय समितीत प्रवेश झाल्यावर विद्यार्थ्याला येथील भोजन घेणेच अनिवार्य असते. रोज सकाळी आणि रात्री अशा दोन वेळेला जेवणाची व्यवस्था आहे.
ग्रंथालय
ग्रंथालय वसतिगृहनिहाय स्वतंत्र ग्रंथालयाची सुविधा आहे. क्रमिक आणि अवांतर पुस्तके उपलब्ध होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन करावे यासाठी प्रयत्न केले जातात.
संगणक
संगणकविद्यार्थी विद्यार्थिनींसाठी सुसज्ज संगणक लॅब आहेत. अभ्यासक्रमाशी निगडीत गोष्टींसाठी विद्यार्थी या लॅबचा उपयोग करू शकतात. तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्याविषयीचे काही अभ्यासक्रमही शिकवले जातात.
आरोग्य केंद्र
आरोग्य केंद्र : प्रवेश झाल्यावर प्रत्येक विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी केली जाते. प्राथमिक उपचाराकरिता डॉक्टरांची सेवा आहे. रुग्णालयात दाखल करायची वेळ आल्यास पालकांशी संपर्काचा प्रयत्न केला जातो. त्या खर्चाची जबाबदारी पालकांची असते.
क्रीडा विभाग – विद्यार्थ्यांना संस्थांतर्गत आणि क्रीडांगणावर खेळण्यासाठी क्रीडासाहित्य उपलब्ध करून दिले जाते. विविध खेळांमध्ये सहभाग नोंदवून शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीबरोबरच स्पर्धेत सहभागी होऊन हार-जीतीचे प्रशिक्षण नकळत मिळते.