समितीचे माजी विद्यार्थी येथील संस्कारांचा लाभ घेऊन बाहेर पडल्यावर आज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. काही परदेशीही आहेत. शिक्षक, पत्रकार, अभियांत्रिकी, वास्तूविशारद, उद्योजक, नाट्य, चित्रपट कला क्षेत्र अशा विविध क्षेत्रांत त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. १९९१ पासून माजी विद्यार्थ्यांचे संघटन सुरू होऊन माजी विद्यार्थी मंडळ सक्षमपणे काम करत आहे. या संघटनासाठी समितीचे कार्यकर्ते स. य. नाडकर्णी आणि माजी पर्यवेक्षक रमाकांत तांबोळी यांनी अविरत प्रयत्न केले. माजी विद्यार्थी मंडळ ही आता स्वतंत्र नोंदणीकृत संस्था आहे. माजी विद्यार्थ्यांचा दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी मेळावा आयोजित केला जातो. सुमारे तीस वर्षे त्यात सातत्य आहे. समितीच्या कार्यातही मंडळाचा मोलाचा सहभाग आहे. विश्वस्त मंडळ, कार्यकर्ता मंडळात अनेक माजी विद्यार्थी आपले योगदान नोंदवत आहेत. काही माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या भागात समितीची माहिती केंद्रे सुरू केली असून त्या भागातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना तेथेच समितीची माहिती उपलब्ध होते. त्या विद्यार्थ्यांविषयी विस्तृत माहिती घेऊन हे विद्यार्थी त्यांच्या प्रवेशासाठी शिफारस पाठवू शकतात. समितीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी माजी विद्यार्थी विविध उपक्रम राबवून निधीसंकलन करतात. तांबोळी सर प्रेरणा निधी उपक्रमाद्वारे समितीसाठी एक कोटी रुपयांचे संकलन माजी विद्यार्थ्यांनी केले. कोविडच्या काळात लॉकडाउनमुळे मजूर, विद्यार्थी, गरिबांचे अतोनात हाल झाले. अशावेळी माजी विद्यार्थ्यांनी सुमारे अडीच महिने अन्नसेवा उपक्रम राबवून सव्वा लाखांहून अधिक भोजनसेवा दिली. पर्यावरणाची जाणीव ठेवत २०२० मध्ये समिती आशीर्वाद वृक्ष संकल्पना राबवत महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात वृक्षावरोपण केले. यातून त्या त्या भागातील समितीच्या आजी विद्यार्थ्यांना कमवा शिका अंतर्गत मोबदला मिळवून दिला.

 

 

माजी विद्यार्थ्यांना आवाहन

 

मित्रांनो,
आपल्या पुण्यातील विद्यार्थी दशेत समिती नसती तर आपले शिक्षण पूर्ण होण्यात अनंत अडचणी आल्या असत्या याची आपल्या सर्वांनाच जाणीव आहे. समिती म्हणजे आपले दुसरे घर होते. आपण सर्व एकमेकांचे मित्र म्हणजे आपला समिती परिवार ही आपली मोठी ताकद आहे. समितीचा माजी विद्यार्थी म्हणजे समाजाचा ऑक्सिजन, अशी समितीच्या अध्यक्षांची भावना आहे. तुम्ही जेथेही असाल तेथे उत्तमच काम करत असणार हा आम्हा सर्वांचा विश्वास आहे.
जेव्हा वेळ मिळेल तेव्हा निश्चित समितीत या. नवीन काय सुरू आहे, त्याची माहिती घ्या. आपल्या परिसरातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना समितीपर्यंत पोचवा.  समितीतील विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारा. कारण आपणच त्यांचे आता खरे मार्गदर्शक ठरू शकतो. बदलत्या काळाचा वेध घेत समितीला पुढे नेण्यासाठी आपल्यापरीने जे शक्य आहे त्यासाठी योगदान नोंदवा.
धन्यवाद.
श्री. तुषार रंजनकर,
कार्यकारी विश्वस्त