पुणे, ता. १६ : “शिक्षणाने भविष्य घडू शकते; मात्र, त्यासाठी योग्य वेळी, योग्य संधी मिळायला हवी. शिक्षणाला नवतंत्रज्ञान, कौशल्य, उद्यमशीलता आणि जिद्दीची जोड मिळाली, तर विद्यार्थ्यांचे भविष्य निश्चितच उज्ज्वल घडेल,” असा विश्वास ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केला. तसेच, ग्रामीण भारताच्या विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत ‘सकाळ’ माध्यम समूहाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योगपती प्रतापराव पवार यांनी व्यक्त केले.

विद्यार्थी साहाय्यक समितीच्या सेनापती बापट रस्त्यावरील ललितकुमार गायकवाड मुलींच्या वसतिगृहात नव्याने उभारण्यात आलेल्या ‘प्रतापराव पवार कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रा’चे उद्घाटन डॉ. माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रात प्रतापराव पवार यांच्या पुढाकारातून व आर्थिक सहकार्यातून एआय प्रशिक्षण, रोबोटिक्स लॅब आणि परदेशी भाषा वर्ग सुरू करण्यात आले आहेत. याचा लाभ समितीच्या विद्यार्थ्यांसह बाहेरील विद्यार्थ्यांनाही घेता येणार आहे.

डॉ. माशेलकर पुढे म्हणाले, “विद्यार्थी साहाय्यक समिती हे केवळ राहण्याचे वसतिगृह नसून, परिवर्तनाचे केंद्र आहे. येथे केवळ निवासाची सोय मिळत नाही, तर आयुष्याच्या यशाची खरी शिदोरी मिळण्याची संधी मिळते. ‘आपण सारे’ या भावनेतून राष्ट्र निर्माण होते आणि प्रतापराव पवार यांचे नेतृत्व याच सामाजिक भावनेतून काम करत आहे.”

कार्यक्रमात अभिनेते योगेश देशपांडे यांनी प्रतापराव पवार यांची प्रकट मुलाखत घेतली. पवार म्हणाले, “आई-वडिलांचे संस्कार आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. जागतिक पातळीवर स्पर्धा करायची असल्यास एआय तंत्रज्ञानाला पर्याय नाही. राजकीय दृष्टी, आर्थिक पाठबळ आणि दर्जेदार शिक्षण असेल, तरच या तंत्रज्ञानाचा उपयोग ग्रामीण भारताच्या उन्नतीसाठी शक्य होईल.”

समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर यांनी संस्थेच्या ६२ वर्षांच्या प्रवासाचा आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण देण्याचा उद्देशाचा आढावा घेतला. याप्रसंगी डॉ. माशेलकर आणि प्रतापराव पवार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. माजी विद्यार्थी व पुणे महापालिकेच्या सहायक आयुक्त सुहास भोसले यांनी सूत्रसंचालन केले. खर्चीदार संजय आमटे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *