विद्यार्थी सहाय्यक समिती हे विद्यार्थ्यांसाठी फक्त निवास आणि भोजनाचे ठिकाण नाही तर ते संस्कार केंद्र आहे…अव्याहत चालु असलेला यज्ञ आहे…. विविध स्तरातून आणि भागातुन आलेल्या शिक्षणार्थीसाठी ते वसतिगृह नसुन दुसरे हक्काचे घरच आहे…समिती प्रेमाची पखरण करुन आश्वस्त करणारी आणि आईच्या मायेची ऊबब देणारी जागा आहे… गाव सोडून शहरात आलेल्या, सैरभैर मानसिकता झालेल्या होतकरु आणि डोळे किलकिले करून भविष्याकडे झेप घेऊ इच्छिणाऱ्यांच्या पंखात शक्ती भरणारे अक्षय ऊर्जास्थान आहे….

 • आदरणीय डाॅ. अच्युतराव आपटे सर आणि त्यांच्या समवेत असलेल्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या निरलस, सेवाभावी, समर्पित भावनेने काम करणाऱ्या अलौकिक थोरांचे “समिती” हे स्वप्न आहे… त्या व्यक्तीमत्वांनी पाहिलेले स्वप्न साकार झाले आहे… त्यांच्या या स्वप्नांमुळेच कित्येकांनी आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणली आहेत….
 • स्वतः मी सन 1977 मध्ये काॅलेज आॅफ इंजिनियरिंग (COEP) प्रवेश घेण्यासाठी पुण्यात पहिल्यांदाच आलो होतो … एका खेडेगावातुन पुण्यात आलो होतो…. परंतु मन मात्र गावाकडील घरातच रेंगाळत होते… शरीराने जरी पुण्यात प्रवेश केला होता, तरी मन रमत नव्हते, येथे एकदम परके वाटायचे… माहिती काहीच नव्हती…राहण्याची सोय नव्हती… वसतिगृहाचा शोध चालू होता. पण मनाला काही ते भावत नव्हते… सर्वच ठिकाणी कोरडेपणा दिसला. माया, ममता, ओलावा कुठे दिसला नाही… माझी अस्वस्थता वाढत होती.. खर्चाचा प्रश्न भेडसावत होता.. अभ्यासात मन लागत नव्हते…
 • असाच कुणीतरी विद्यार्थी सहाय्यक समितीचा ओझरता उल्लेख केला… सायकलवर शोध घेत समितीच्या, फर्ग्युसन रोडवरील छोटेखानी कौलारू आॅफीसला आलो… आदरणीय पटवर्धन सर आणि यादवराव कुलकर्णी सरांची तेथे मुलाखत झाली… माझी एकंदरीत स्थिती बारकाईने न्याहाळत त्यांनी माझी जुजबी चौकशी करुन आणि एकंदरीत अंदाज घेऊन, माझ्याकडुन तेथेच फार्म भरुन घेतला…अत्यंत माफक दरात (450 रुपये टर्म फी आणि 45 रुपये महिना मेस ) राहण्याची व्यवस्था आणि आठवड्यातून चार तास काम करावे लागेल, असे सांगितले… त्यांच्या बोलण्यातून, नजरेतून जे प्रेम मला दिसले तेंव्हाच मनात मी ठरवले, हेच आपले पंढरपुर!!
  पंढरपुरात एकच विठोबा आहे परंतु नंतरच्या काळात येथे अनेक विठोबा असल्याचे मला दिसले… आईवडिलांसारखे माया, ममता, प्रेम करणारे, मायबाप मला येथेच भेटले… आदरणीय निर्मलाताईंचे नुसते दर्शनही आईच्या प्रेमाची भूक भागवत असे… आदरणीय तांबोळी सरांसारखे, “अरे अभ्यास करा, चांगले राहा”, असे सांगत, आमच्या व्हरांड्यातुन दिवस असो रात्र असो, सतत आधार आणि विश्वास देत, आमच्या अवती भवती असत… वडीलांची जागा त्यांनी केंव्हाच काबीज केली होती… त्यांचा तो उत्साह , तीच धडपड, तोच आश्वासक आवाज आजही या वयात तसाच आहे…. 🙏
 • समितीत राहुन मी नुसता फक्त शिकलो असे नव्हे तर घडलो आहे, जीवनाला एक आकार, नवा दृष्टीकोन, संस्कार येथेच मला मिळाला… समितीचे “शिकवा आणि घडवा” हेच ध्येय राहिलेले आहे…. विशेष म्हणजे असे चित्र अन्यत्र अभावानेच दिसते, यातच समितीचे वेगळेपण आहे…. ज्या तपस्वींच्या पायाभरणीने आणि योगदानाने समिती बहरलीय, त्यांचा वारसा आजही पुढची पिढी सांभाळत आहे… तितक्याच सक्षमतेने.. तितक्याच कार्यक्षमतेने…!!! नावे किती घ्यावीत अन् किती नाहीत हा प्रश्नच आहे !!!
 • लाॅजिंग बोर्डींग या व्यावहारिक संकल्पनेपासून समिती, कोसो मैल दूर आहे… नव्हे तर, अशी तुलना करणेही गैर आहे…. समिती एक बृहद्कुटुंब आहे… आणि दिवसेंदिवस ते विस्तारत आहे… या कुटुंबपरिवाराचा सदस्य असल्याचा मला आणि इतर सर्वांनाच सार्थ अभिमान आहे… हा अभिमान आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत असाच चिरंतन राहाणार आहे….. समितीतून बाहेर पडून जीवनाची पुढील वाटचाल सुरु झाल्यावरही वेळोवेळी, विविध प्रसंगी समितीची आठवण जागवली जातेच… एक संदर्भ तसेच दीपस्तंभ म्हणून समितीचा उल्लेख केला जातोच…. समितीचे प्रत्येकाच्या हृदयात एक चिरंतन स्थान निर्माण झालेली असते…. कुठे कुणाच्या बोलण्यातून, बातमीतून समितीचा उल्लेख आला तर, कान टवकारले जातात, भरभरुन बोलले जाते, आठवणी जागवल्या जातात…. अगदी माहेरच्या बदल एखाद्या लेकीकडुन जितक्या आत्मियतेने बोलले जाते, तितक्याच आत्मियतेने !!! त्याबरोबरच “मी सुद्धा समितीत होतो” हे अभिमानाने सांगितले जाते. केवळ समितीत असण्याचा हा समान धागाच, एकमेकात विश्वासार्हता निर्माण करतो…. असे चित्र अभावानेच दिसते….
  समितीमधे विविध उपक्रम, परिसंवाद, व्यक्तीमत्व विकास, शिबिरे, मेळावे, बदलती जीवनशैली तसेच सातत्याने आधुनिकीकरण होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या अनुरुप विविधांगी आणि बहुउद्देशीय कार्यक्रम होत असतात. जीवन परिपूर्णतेच्या दृष्टीने याचे अपरंपार महत्त्व आहे.
 • मला एक प्रसंग आवर्जुन नमुद करावासा वाटतो. सन 1979 मध्ये तत्कालीन राज्यमंत्री वनाधिपती स्वर्गीय विनायकराव पाटील समितीत आले होते… त्यांचा स्वर्गीय निर्मलाताईंबरोबर झालेला संवाद माझ्या कानी पडला… तो आजही जसा आहे तसाच स्मरतोय…. स्वर्गीय निर्मलाताई चालता चालता विनायकराव पाटील यांना म्हणाल्या , “आपले समितीत हृदयस्त स्वागत आहे. पुंडलीकाभेटी पांडुरंग आले!! ” त्यावर विनायकराव पाटील म्हणाले, ” नाही नाही, पांडुरंगाभेटी पुंडलिक आला !!! हे माझे सद्भाग्य आहे कि, तुम्ही मला येथे आमंत्रित केले आहे. आमचे काही खरे नाही, आम्ही बिघडवतो, मात्र तुम्ही घडवता!! या तपोभूमिवरुन परत जाताना मी खात्रीने घडवला जाणार आहे !! जाताना तुमचा तो सेवाभाव माझ्या मडक्यात भरता आला तर तेवढे बघा, धन्य होईल मी, माझे तुमच्याकडे एवढेच मागणे आहे !!! “…..विनायकराव पाटीलही ग्रेट आणि निर्मलाताईही ग्रेट……. आणि अशा अनेक ग्रेटांच्या मांदियाळीत आम्हाला घडवणारी समिती त्याहून ग्रेट !!!… अर्थातच आम्हीही तेवढेच भाग्यवान !!!!
  🙏 🙏 🙏 🙏 🙏

श्री उत्तमराव निर्मळ, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग
नाशिक.. मो. 7276772400
( सन 1977-79 लजपत वसतीगृह आणि सन 1979-81 नवीन वसतीगृह एफसी रोड )

1 thought on “विद्यार्थी सहाय्यक समिती हे विद्यार्थ्यांसाठी फक्त निवास आणि भोजनाचे ठिकाण नाही तर ते संस्कार केंद्र – श्री उत्तमराव निर्मळ

 1. अतिशय सुंदर लेख. मार्मिक वर्णन. विद्यार्थी सहाय्यक समितीच्या कार्याला शत शत प्रणाम आणि वंदन. हा यज्ञ असाच अव्याहत चालू राहू देत हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि अनेक शुभेच्छा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत